चंदीगडमधील नाईट क्लबवर झालेल्या बॉम्ब हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये शाल घेतलेला एक व्यक्ती दिसत आहे, जो नाईट क्लबच्या दिशेने हातातून बॉम्ब घेऊन येतो आणि नंतर फेकतो. क्लबच्या भिंतीवर बॉम्ब आदळल्यानंतर धुराचे लोटही उठताना दिसत आहेत. हे फुटेज समोर आल्यानंतर पोलीस आता आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
२६ नोव्हेंबरला सकाळी एका नाईट क्लबवर बॉम्बहल्ला केल्याचं समोर आलं आहे. हल्लेखोर बाईकवरून आले होते. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास हा हल्ला झाला. हा हल्ला अत्यंत कमी तीव्रतेचा होता, त्यामुळे यात कोणीही जखमी झालेलं नाही.
चंदीगड पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदीगडच्या नाईट क्लबबाहेर फटाक्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पोटॅशचा वापर करून बॉम्बचा स्फोट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळावरून काही दोऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. स्फोट झाला तेव्हा नाईट क्लब बंद होता.
दहशत पसरवण्याच्या उद्देशानेच हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचं समजतं. प्राथमिक तपासात नाईट क्लबच्या मालकांमध्ये दहशत पसरवून या स्फोटामागे खंडणीचा अँगल असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. चंदीगड पोलीस फॉरेन्सिक टीमच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत.