बिहारमध्ये दोन लाख रुपये देऊन बनावट आयपीएस अधिकारी बनलेल्या मिथिलेश कुमारने त्याचं नवीन स्वप्न सांगितलं आहे. मला आता पोलीस व्हायचं नाही तर डॉक्टर व्हायचं आहे, असं म्हटलं आहे. डॉक्टर बनून काय करणार असा प्रश्न त्याला विचारला असता सर्वांना वाचवणार असल्याचं त्याने सांगितलं. सोशल मीडियावर त्याचा हा मजेशीर व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
एका मुलाखतीत मिथिलेश कुमारला विचारण्यात आलं की, तू दहावी पास आहेस. आयपीएस अधिकारीही झाला आहे. आता पुढे तुला काय व्हायची इच्छा आहे? यावर मिथिलेश म्हणाला, "आता तो पोलीस बनणार नाही. आता तो डॉक्टर होणार आहे." डॉक्टर बनून काय करणार आहेस असा प्रश्न त्याला मुलाखत घेणाऱ्याने विचारला. त्यावर त्याने सर्वांचा जीव वाचवायचा असल्याचं उत्तर दिलं.
१९ वर्षीय मिथलेश कुमार हा लखीसराय जिल्ह्यातील हलसी पोलीस स्टेशन क्षेत्रातील गोवर्धन बिघा गावचा रहिवासी आहे. आयपीएसच्या ड्रेसमध्ये फिरत असताना त्याला अटक करण्यात आली. त्याने पोलिसांना सांगितले की, खैरा भागातील मनोज सिंह नावाच्या व्यक्तीने त्याला पोलिसात नोकरीची ऑफर दिली होती आणि त्यासाठी त्याच्याकडे दोन लाख तीस हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.
मिथलेशने त्यासाठी त्याच्या मामाकडून दोन लाख रुपये घेतले. पोलिसात नोकरी मिळावी म्हणून त्याने ते पैसे मनोज सिंहला दिले. त्यानंतर मनोजने दुसऱ्या दिवशी त्याला बोलावून आयपीएस गणवेश, आयपीएस बॅच आणि बनावट पिस्तुल दिलं. मिथलेश आनंदाने गणवेश घालून त्याच्या घरी गेला आणि आईचे आशीर्वाद घेतले.
मिथलेश थोड्या वेळाने पुन्हा मग मनोज सिंहला भेटायला निघाला. मिथलेशने सांगितलं की, मनोजने त्याला गणवेश घालून बोलावले आणि उर्वरित तीस हजार रुपयांची मागणी केली. मिथलेश भेटण्यासाठी जात असताना सिकंदरा चौकात काही वेळ थांबला असता पोलिसांनी त्याला अटक केली आहे. यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झाला.