कर्नाटकातकाँग्रेसचे सरकार आल्यानंतर महिलांसाठी मोफत बस प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. या बसमधून प्रवास करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने येत आहेत. मंगळवारी या महिलांसाठी चालवलेल्या बसमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन महिला जोरदार भांडताना दिसत आहेत. बसमध्ये एक सीट रिकामी होती, त्याठिकाणी एका महिलेने ओढणी टाकून ती सीट अडवण्याचा प्रयत्न केला, पण तितक्यात दुसरी महिला आली आणि बसली.
बसमध्ये बसण्यावरून सुरू झालेला वाद पुढे टोकाला गेला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कर्नाटक सरकारच्या मोफत बसमध्ये महिला जोरजोराने भांडताना दिसत आहेत. तर काही लोक हे भांडण सोडवताना दिसत आहेत. दोन्ही महिला एकाच सीटवर बसण्यासाठी दावा करत असल्याचे सांगण्यात आलं आहे. म्हैसूरहून चामुंडी हिल्सकडे जाणाऱ्या बसमध्ये ही घटना घडली.
बस भरलेली होती आणि त्यात एक सीट रिकामी होती, त्यावेळी एका महिलेने त्यावर ओढणी टाकली आणि ती अडवली. बसमध्ये उभ्या असलेल्या एका महिलेने ती ओढणी काढून बसवरील सीटवर बसण्यास सुरुवात केली असता, पहिल्या महिलेने सीटवर बसलेल्या दुसऱ्या महिलेला सीटवरून उठण्यास सांगितले, परंतु तिने तसे करण्यास नकार दिल्याने दोघी एकमेकांशी भिडल्या.
काही वेळातच वादावादी इतकी वाढली की, बसमध्ये थेट हाणामारीही सुरू झाली. व्हिडिओत बसमध्ये उपस्थित काही महिला आणि तरुण भांडण करणाऱ्या महिलांना वेगळे करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून महिलांसाठी मोफत बससेवेवरून काही जण टीका करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.