अमृतसर - पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात ही घटना घडली. बादल यांच्यावर झालेल्या गोळीबारात ते थोडक्यात बचावले. सुवर्ण मंदिर प्रवेशद्वारावर सुखबीर सिंग बादल सेवा करत होते त्यावेळी एका व्यक्तीने अचानक गोळीबारी केली. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ या हल्लेखोराला पकडले.
नुकतेच सुखबीर सिंग बादल यांना अखाल तख्तने(शीख धर्मातील सर्वोच्च समिती) धार्मिक शिक्षा सुनावली होती. २०१५ मध्ये तत्कालीन अकाली सरकारच्या काळात सरकारकडून झालेल्या चुकांची कबुली दिल्यानंतर अखाल तख्तने सोमवारी बादल यांच्यासह तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांना अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील शौचालय साफ करणे, लंगरमध्ये सेवा देणे आणि भांडी धुण्याची शिक्षा सुनावली होती. त्याच शिक्षेचा भाग म्हणून बादल हे सुवर्ण मंदिरात प्रवेशद्वारावर सेवा देत होते. त्यावेळी ही घटना घडली.