पाटणा - बिहारमध्ये राज्य सरकारचं अधिवेशन सत्र सुरू असून मंगळवारी चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. सरकारच्या आदेशानंतर सुरक्षा जवानांनी आमदारांना सभागृहातून बाहेर काढताना राडा झाल्याचं दिसून आलं. या झटापटीत अनेक आमदारांनापोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यावरुन विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव चांगलेच संतापले असून आमदारांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला. तेजस्वी यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यांसदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, या आमदारास रुग्णवाहिकेतून न्यावे लागल्याचेही त्यांनी सांगितलं.
बिहार विधानसभेत मंगळवारी 'विशेष सशस्त्र पोलीस विधेयक 2021' संमत करण्यात आले. या विधेयकास विरोध करताना विरोधकांनी गोंधळ केला, तर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी हे बिल फाडून अध्यक्षांसमोरच फेकून दिले. तेजस्वी यादव यांनी अशारितीने आपला विरोध दर्शवल्यानंतर इतर आमदारांनीही या विधेयकाला विरोध असल्याचे सांगत घोषणाबाजी केली. तसेच, वेलमध्ये येऊन आपला विरोध दर्शवला. त्यानंतर, मोठा गोंधळ उडाल्यामुळे पोलीस जवान आणि सुरक्षा रक्षकांनी हाताला धरुन बळजबरीने आमदारांना सभागृहाबाहेर काढले. त्यावरुन, तेजस्वी यादव यांनी संताप व्यक्त केला आहे.
अति मागास समाजातून आलेल्या आमच्या महिला आमदारांचे केस ओढण्यात आले. आमच्या आमदारांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, असा आरोप विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुनच पोलिसांनी, जवानांनी हे कृत्य केलं असून आम्ही जेव्हा सभागृहात असतो तेव्हा मुख्यमंत्री सभागृहाबाहेर असतात, असेही यादव म्हणाले. तसेच, एक व्हिडिओ शेअर करत, राजदच्या आमदारांना लोकशाही मंदिरातच मारहाण झाल्याचंही ते म्हणाले. गुंड वृत्तीच्या सरकारच्या गुंडांनी आमदारांना स्ट्रेचरवर जावं लागेल, एवढं बेदम मारलं, रुग्णवाहिकेतून त्यांना दवाखान्यात नेलं, असंही यादव यांनी सांगितलं.
आमदारांनी सरकारविरोधी घोषणबाजी केल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. आमदारांना सभागृहाबाहेर घेऊन येताना पोलिसांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. विधानसभा सभागृहात आमदारांसमवेत करण्यात आलेल्या व्यवहारामुळे राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमार सरकारवर जबरी टीका केलीय. नितीश कुमार सरकार हे बलात्काऱ्यांपेक्षाही वाईट असल्याचं आरजेडीने म्हटलंय.
लोकशाहीची जननी असलेल्या बिहारमधील लोकशाहीच्या मंदिरात लोकशाहीलाच नागवं केलंय. लोकशाहीचा बलात्कार केलाय, अशी गंभीर टीकाही त्यांनी केली. आमदार महेबुब आलम यांच्यासह अनेक आमदारांचा कुर्ता फाडण्यात आल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. सरकार वाद-विवाद होऊ देत नसून माफिया राज असल्यागत वागत आहे, असेही ते म्हणाले. सुरक्षा रक्षकांनी आमच्यासोबत गैरव्यवहार केला आहे. आम्ही बिलास विरोध केल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी माझ्या छातीवर मारहाण केल्याने मी जखमी झालो, असा आरोप आमदार सत्येंद्र यांनी केला आहे.