अमरेली - जंगलाचा राजा सिंह समोर आला तर भल्याभल्याला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. मात्र गुजरातमध्ये एक घटना अशी घडली आहे की, गायींना वाचविण्यासाठी एक माणूस थेट सिंहाशी भिडला हे ऐकुन तुम्हालाही धक्का बसेल पण प्रत्यक्षात असं घडलं आहे.
गुजरातच्या अमरेली येथील खांभा जंगलाजवळ असलेल्या शहरात रात्री उशीरा सिंह घुसला होता. शहरातील कॉलनीत एक सिंह गायींच्या मागे धावत असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. जीव वाचविण्यासाठी गाई पळत होत्या. त्यांच्यामागे सिंह लागला होता. काही जण घरातील खिडक्यातून सिंहाला पाहत होते. सिंह कॉलनीत घुसल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं.
माध्यमांच्या माहितीनुसार अमरेलीतील आनंद सोसायटी परिसरात सिंह घुसला होता. त्याठिकाणी असलेल्या गोशाळामध्ये अनेक गाई होत्या. गाईंची शिकार करण्यासाठी सिंहांने 15 फूट उंच भिंत ओलांडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गाईंच्या मागे लागलेल्या सिंहाला बघितल्यानंतर गोशाळेचे संचालक देवशीभाई वढेरी यांनी हातात काठी घेत न भिता सिंहाला सामोरे गेले. संचालकाला हातात काठी घेऊन पाहिल्याने सिंहाने तिथून पळ काढला. त्यामुळे गाईंचा जीव वाचला.