संभल - उत्तर प्रदेशमधील संभल येथे पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. एका शेतात लपून बसलेल्या गुंडांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी, अचानक पोलीस अधिकाऱ्याजवळ असलेली बंदुक बिघडली. ही बंदुक जाम झाल्याने त्यातून गोळी फायर होत नव्हती. त्यामुळे या बंद पडलेल्या बंदुकीचा आधार घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्याने ढिश्शक्याव ढिश्शक्याव.. असा आवाज करत या गुंडांना पाठलाग केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पोलीस आणि गुंडांच्या या चमकीवेळी पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने एका गुंडांच्या पायावर गोळी झाडून त्यास पकडले. मात्र, अचानक बंदुक बंद पडल्यानंतर संबंधित पोलिसाने लढवलेली शक्कल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुक्रवार 12 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून नेटीझन्सकडून सोशल साईटवर शेअर केला जात आहे. त्यामध्ये, एक पोलीस अधिकारी घेरो.. घरो... ठांय ठांय असा आवाज काढताना दिसत आहे. या पोलीस अधिकाऱ्याची खिल्लीही उडवली जात आहे. तर काही जणांकडून लढवलेल्या शक्कलेबद्दल कौतूकही होत आहे. दरम्यान, याप्रकरणी संभलचे पोलीस अधीक्षक जमुना प्रसाद यांनी माहिती देताना, संबंधित पोलीस अधिकाऱ्याची बंदुक अचानक जाम झाल्याचे सांगितले.