पाटणा - बिहारमधील काही भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झालेली आहे. या पुरामध्ये एक हत्ती पाठीवर माहुताला घेऊन गंगा नदीतून यशस्वीपणे पलीकडे नेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील राघोपूर येथे घडली आहे.
गंगा नदीमधील पाणी अचानक वाढल्याने नदीच्या प्रवाहात माहूत हत्तीसह फसला. व्हिडीओमध्ये हत्ती माहुतासह पाण्याच्या वेगवान प्रवाहातून मार्ग काढताना दिसत आहे. हत्ती पाण्यामध्ये पूर्णपणे बुडालेला दिसत आहे. त्यामुळे हत्ती आणि माहूत पाण्यात वाहून जातील असं वाटतं. मात्र अखेरीस हत्ती आणि माहूत नदीच्या एका किनाऱ्यावर पोहोचण्यात यशस्वी ठरतात.
स्थानिकांनी सांगितले की, हा हत्ती पुराच्या पाण्यामध्ये रुस्तमपूर घाटापासून पाटना केथुकी घाटादरम्यान एक किलोमीटर पोहून गेला. त्यांनी सांगितले की, माहूत मंगळवारी हत्तीसोबत आला होता. मात्र गंगेतील पाणी अचानक वाढल्याने दोघेही पुरात अडकले. हत्तीला वाचवण्यासाठी एका नावेची गरज होती. मात्र त्याच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने त्याने हत्तीसह नदी पार करण्याचा निर्णय घेतला. माहूत हत्तीचे कान घट्ट पकडून बसला होता.
दरम्यान, ट्विटरवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंटरनेट युझर्सनी लिहिलं की हत्तीने माणसाची अडचण समजली, त्यामुळेच त्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून नदी झोकून घेतले आणि यशस्वीपणे किनारा गाठला.