तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. काही लोकांचा मृत्यू झाला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. याच दरम्यान एक वेदनादायक, काळजात चर्र करणारा आणि चिंता वाढवणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुण भाजीच्या कॅरेटमधून एका छोट्या बाळाला पुराच्या पाण्यातून घेऊन जाताना दिसत आहेत.
पावसाने कहर केला असून गंभीर परिस्थिती पाहायला मिळत आहे. परिसरात पाणी साचलं आहे. अशातच दोन तरूण एका बाळाला भाजीच्या कॅरेटमधून घेऊन जात असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पण नेमक्या कोणत्या परिसरातील आहे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. पावसामुळे स्थानिकांना किती त्रास सहन करावा लागत आहे, याचा अंदाज हा व्हिडीओ पाहूनच लावता येईल.
३३ जणांचा मृत्यू
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्येपूर आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्रमध्ये नौदलाला मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. NDRF ने गेल्या २४ तासांत आंध्रमध्ये ५००० आणि तेलंगणात २००० लोकांना वाचवलं आहे. गुजरातमध्येही मंगळवारी अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने या आठवड्यात गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
हजारो एकरमधील पिकंही झाली नष्ट
तेलंगणात आतापर्यंत १६ आणि आंध्र प्रदेशात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सततचा पाऊस आणि पुरामुळे अनेक रस्ते वाहून गेले. याशिवाय हजारो एकरमधील पिकंही नष्ट झाली. आंध्र प्रदेशात नौदलाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठीही लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने बाधित भागातील लोकांपर्यंत ड्रोनद्वारे मदत साहित्य पोहोचवलं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आपापल्या भागातील पूरग्रस्त भागांना भेट दिली.