अमेठी - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी निवडणूक प्रचारावेळी चक्क शेतात जाऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अमेठी मतदारसंघातील दुआराच्या गोवर्धन गावातील एका गव्हाच्या शेतात आग लागली होती. याबाबत स्मृती इराणींना माहिती मिळताच, त्यांनी आपला कार्यक्रम बाजुला ठेऊन आग विझविण्यासाठी स्थानिकांना मदत केली. विशेष म्हणजे यावेळी हापश्यातून पाणीही काढले.
आपल्या शेतातील सर्व पीकच नष्ट झाल्याचे पाहून तेथील महिलांनी स्मृती इराणींच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट मोकळी केली. इराणी यांनीही त्या महिलांचे सात्वन करत त्यांना धीर दिला. याबाबत स्मृती इराणींना तात्काळ संबंधित प्रशासकीय यंत्रणांना फोन करुन याबाबत माहिती दिली. तसेच, पीडित शेतकऱ्यास न्याय मिळवून देण्याचेही बजावले. स्मृती इराणी अमेठी मतदारसंघातून राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यानिमित्त सध्या मतदारसंघात त्यांचे प्रचारदौरे सुरू आहेत.