ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 18 - हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला दलित नसल्याचा अहवाल काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आयोगाने सादर केला होता. मात्र आपण दलितच असल्याचा पुरावा स्वतः रोहित वेमुलाने दिला आहे. रोहित स्वतः 'मी दलित आहे' असे सांगत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण प्राप्त झाले आहे. 'जय भीम, माझे नाव रोहित वेमुला, मी दलित असून गुंटुर जिल्ह्यातील रहिवासी आहे, 2010 पासून मी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठामध्ये शिकत आहे', असे रोहित या व्हिडिओद्वारे सांगताना दिसत आहे. जवळपास दोन ते तीन मिनिटांचा हा व्हिडीओ आहे.
रोहितने आत्महत्या करण्यापूर्वी 5 ते 10 जानेवारीदरम्यान हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. मात्र, पोलीस आणि मनुष्यबळ विकास मंत्रालय आतापर्यंत रोहित वेमुलाच्या दलित असण्यावर प्रश्न उपस्थित करत आले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ रोहित दलित असल्याचा पुरावा देणारा आहे, असे त्याच्या मित्र परिवाने म्हटले आहे. फेसबुकवरील मोहीमेसाठी रोहितने हे रेकॉर्डिंग केले होते. दरम्यान, या व्हिडीओची सत्यता पडताळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आणखी बातम्या
'तपास अधिका-यांना रोहित वेमुला दलित असल्याचा पुरावा म्हणून या व्हिडीओचा विचार करावा. तसेच पोलिसांनी अॅट्रोसिटी कायद्या अंतर्गत या प्रकरणाचा तपास केलेला नाही. याच पार्श्वभूमीवर, रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाची अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत चौकशी करुन आरोपींविरोधात तातडीने कारवाई करावी', अशी मागणी रोहितचा मित्र प्रशांत दोन्ठा याने केली आहे. या व्हिडीओमध्ये प्रशांत रोहितच्या पाठिमागे बसलेला दिसतो आहे. दरम्यान, रोहित वेमुलाला न्याय मिळवून देण्यासाठी हा व्हिडीओ लवकरच पोलिसांकडे सुपुर्द करणार असल्याचेही प्रशांतने सांगितले आहे.