बंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना पुन्हा एकदा अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. कर्नाटकमधील मंडया जिल्ह्यात आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना, सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन त्यांच्या डोळ्यात पाणी आले. मी काय चूक केली, म्हणून मंडया येथील जनतेनं मला पराभूत केलं. मला राजकारण नकोय, मला मुख्यमंत्रीपदीही नकोय. मला फक्त तुमचं प्रेम हवंय, असे म्हणत त्यांनी थेट स्टेजवरच रडायला सुरुवात केली.
राजकारणात कुणावर विश्वास ठेवावा अन् कुणावर नाही, अशी परिस्थीती आहे. सध्याचं राजकारण हे न समजणार आहे, असे म्हणत कुमारस्वामींनी जनतेसमोरच अश्रूंना वाट मोकळी करून दिली. माझ्या मुलाने निवडणूक लढवावी असं मला वाटत नव्हत. पण, त्याच्या समर्थकांच्या आग्रहामुळे त्याने निवडणूक लढवली, पण त्याचा येथे पराभव झाला. माझ्यासारख्या व्यक्तीने राजकारणात असताच कामा नये, मला अजिबात समजत नाहीये की राजकारणात कुणावर विश्वास ठेवावा अन् कुणावर नाही?, असेही स्वामींनी म्हटले. दरम्यान, यापूर्वीही मंडया येथील निवडणूक प्रचार रॅलीमध्ये ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी, मी एक भावूक व्यक्ती असून असहाय्य नसल्याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं.