हैदराबाद - तेलंगणातही परतीच्या पावसाने हाहाकार माजला असून नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे काही भागांत गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचा राग अनावर होत आहे. राज्यातील अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झालाआहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केली आहे. तर, दुसरीकडे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आपल्या भागात पाहणीसाठी आलेल्या आमदारास स्थानिक महिलांनी चांगलंच सुनावलं.
महाराष्ट्रात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे प. महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. बुधवारी झालेल्या ढगफुटीने अनेक नद्यांना पूर आला. लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्याचं चित्र असून अनेक भागांत शेतीही पाण्याखाली गेली आहे. सोशल मीडियातून शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे आणि वेदनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेलंगणा राज्यातही तशीच परिस्थिती दिसत आहे. हैदराबादमध्ये पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हैदराबादसह आजुबाजूचे काही जिल्हे पूराच्या पाण्याने प्रभावित झाले असून 101 तलाव भरुन वाहत आहेत. तर, राज्यातील 7.3 लाख एकर शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे.
हैदराबादमधील लोकांच्या घरा-घरात पाणी शिरले असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. निर्सग शक्तीपुढे प्रशासन हतबल झाले आहे. पावसाचा जोर ओसरल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी पूरग्रस्त भागांची पाहणी करताना दिसत आहेत. हैदराबादच्या उप्पल मतदारसंघातील आमदार सुभाष रेड्डी हे स्थानिक भागात पाहणीसाठी गेले असताना महिलांना त्यांना चांगलेच सुनावले. त्यावेळी, आमदार व महिलांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पीडित महिलांनी तुमचे नाव लिहून आत्महत्या करू, असा इशाराच आमदार महोदयांना दिला. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी यासंदर्भातील व्हिडिओचे ट्विट शेअर केले आहे.
उप्पल मतदारसंघात आमदार सुभाष रेड्डी हे नावेत बसून पूरग्रस्त भागांची पाहणी करत होते. त्यावेळी, रविंद्र नगर कॉलनीत 3 दिवसांपासून पूराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा रोष बाहेर पडला. विशेष म्हणजे 3 दिवसांपासून या भागात वीजही नव्हती. त्यामुळे, महिलांनी आमदार महोदयांना खडे बोल सुनावले. तसेच, तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याची धमकीही दिली.