नवी दिल्ली : 14 फेब्रुवारीला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर पुलवामामध्ये केलेला भ्याड हल्ला, यानंतर भारताने बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उडवून लावले होते. याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याच्या इराद्याने अमेरिकेच्या एफ 16 विमानांसह लढाऊ विमाने पाठविली होती. मात्र, त्या विमानांना पळवून लावत असताना एफ 16 पाडणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान पडल्याने पाकिस्तानात ताब्यात घेण्यात आले होते. अभिनंदन यांना अचूक मार्गदर्शन करणारी रणरागिणी आज समोर आली आहे.
विंग कमांडर अभिनंदन यांना आज वीरचक्र प्रदान करण्यात आले. नाट्यमय घडामोडींनंतर अभिनंदन भारतात परतले होते. या अभियानावेळची कंट्रोल रूम मधली परिस्थिती भारतीय हवाई दलाच्या स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांनी या निमित्त सांगितली आहे. मिंटी अग्रवाल यांनाही वीरचक्र प्रदान करण्यात आले.
आमची हवाई दलाची टीम 26 जुलैला बालाकोटवर हवाई हल्ला करून यशस्वीरित्या माघारी परतली होती. आमच्याकडे हवाई सीमेचे रक्षण करण्यासाठी कमी विमाने होती. ते (पाकिस्तानी) भारतात विध्वंस करण्याच्या उद्देशाने मोठ्या संख्येने घुसले होते. मात्र, आमच्या पायलटनी धाडस दाखविल्याने त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त झाले, असे अग्रवाल म्हणाल्या.
अटीतटीच्या क्षणांवेळी अभिनंदन यांनी अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले एफ-16 पाडले. तेव्हाची परिस्थीती युद्धाची होती. त्यांची विमाने मोठ्या संख्येने होती आणि आमच्या लढाऊ विमानांनी त्यांना कडवी झुंज दिली. 26 आणि 27 तारखेच्या लढाईमध्ये मी देखील सहभागी होते. अभिनंदन यांच्यासोबत दोन्ही बाजुने संभाषण करत होते. जेव्हा त्यांचे विमान हवेत होते, तेव्हा त्यांना दुष्मनाच्या विमानांचा अचूक ठावठिकाणा कळवत होते. अभिनंदन यांना आसपासच्या परिस्थितीचे माझ्याकडून योग्य मार्गदर्शन झाल्याने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडता आल्याचे मिंटी अग्रवाल यांनी सांगितले.