चंदीगड: पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये तैनात आरोग्य सचिव यशपाल गर्ग यांची सध्या जोरदार चर्चा होत आहे. 2008 बॅचचे IAS अधिकारी असलेल्या गर्ग यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन म्हणजेच सीपीआर देताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगड सेक्टर-41 चे रहिवासी जनक लाल मंगळवारी सकाळी चंदीगड हाउसिंग बोर्ड (सीएचबी) च्या ऑफीसमध्ये गेले होते, यावेळी त्यांना अचानक हर्ट अटॅक आला आणि ते कोसळले. यावेळी आरोग्य सचिव यशपाल गर्ग तात्काळ जनक लाल यांच्याकडे आले आणि त्यांना सीपीआर देऊन त्यांचा जीव वाचवला. सध्या त्यांना सरकारी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आणि यशपाल गर्ग यांचे कौतुक केले. तसेच, प्रत्येकाने सीपीआर शिकून घ्यायला हवे, असेही त्या म्हणाल्या. याबाबत यशपाल गर्ग म्हणाले की, ‘मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो, तेवढ्यात मला समजले की, एका व्यक्तीला अटॅक आला आहे. मी धावत त्याच्याकडे गेलो आणि सीपीआर दिला. मला सीपीआरचा अनुभव नाही, पण टीव्हीवर सीपीआर कसा द्यायचा, ते पाहिलं होतं. मला त्यावेळेस काहीच सूचलं नाही आणि मी सीपीआर दिला.'