देवळी-उनियारा: झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसोबतच देशभरात अनेक ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका होत आहेत. राजस्थानच्या देवली-उनियारा जागेवरही पोटनिवडणूक होत असून, आज येथे मतदानादरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे. एका अपक्ष उमेदवाराने थेट उपजिल्हाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?आपले निवडणूक चिन्ह ईव्हीएम मशीनमध्ये स्पष्टपणे दिसत नसल्याचा आरोप करत अपक्ष उमेदवार नरेश मीना (देवळी-उनियारा) यांनी बळजबरीने मतदान केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला. प्रशासन आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता बाचाबाची झाली. यावेळी त्यांनी थेट उपजिल्हाधिकारी अमित चौधरी यांच्या कानशिलात लगावली. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
कोण आहेत नरेश मीना?काँग्रेसविरोधात बंडखोरी करुन नरेश मीणा अपक्ष पोटनिवडणूक लढवत आहेत. पक्षाने त्यांना पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे निलंबित केले आहे. दरम्यान, या घटनेने जोर पकडला असून, अधिकाऱ्यांमध्येही नाराजी पसरली आहे. अतिरिक्त पोलीस अधिक्षक ब्रिजेंद्र सिंह भाटी यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडला.
दरम्यान, या जागेवर काँग्रेसकडून कस्तुरचंद मीना आणि भाजपकडून राजेंद्र गुर्जर रिंगणात आहेत. नरेश मीणा यांनी या जागेवर काँग्रेसकडून तिकिटाची मागणी केली होती, मात्र तिकीट न मिळाल्याने ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.