नवी दिल्ली - देशभरात सध्या कडाक्याची थंडी सुरू आहे. उत्तर भारतात कमालीची थंडी पडली असून काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी सुरू आहे. यादरम्यान, उत्तराखंडातील औली येथे 11 हजार फुटांवर रक्त गोठवणाऱ्या थंडीत इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस जवान मार्शल आर्टचा सराव करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. देशाच्या सीमारेषेवर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांच्या देशभक्तीच्या उत्साहावर हवामानाचा कोणताही परिणाम होत नसल्याचे या व्हिडीओद्वारे दिसत आहे. विशेष म्हणजे कडाक्याच्या थंडीत मार्शल आर्ट सरावादरम्यान जवानांच्या कमरेपासून वरील शरीरामध्ये एकही कपडा दिसत नाही.
उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमधील बऱ्याच ठिकाणी सध्या प्रचंड बर्फवृष्टी होत असून तापमान उणे अंश सेल्सिअसमध्ये आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात बुधवारपर्यंत (30 जानेवारी) हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.