नवी दिल्ली - भारताने मशिन चंद्रयान ३ यशस्वी केल्यामुळे जगभरात भारताकडे सन्मानाने आणि आदराने पाहिले जात आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत हा पहिलाच देश आहे. त्यामुळे, भारताच्या अंतराळ मोहिमेचं जगभरातून कौतुक होतंय. तर, चंद्रावर पोहोचलेल्या बोटावर मोजण्याइतक्या देशांपैकी भारत एक आहे, ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असा सुविचार आपण वाचला असेल. मात्र, चंद्रयान २ च्या अपयशानंतर चंद्रयान ३ च्या यशाने हा सुविचार सत्यात उतरला आहे.
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांच्या टीमने चंद्रयान ३ मोहिम यशस्वी करुन दाखवली. जगाचं लक्ष लागलेल्या या मोहिमेचे खरे हिरो इस्रोतील शास्त्रज्ञ आणि त्यांनी या मोहिमेसाठी घेतलेले परिश्रम आहे. त्यामुळे, इस्रोच्या शास्त्रज्ञांवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही विदेश दौऱ्याहून थेट बंगळुरूला जाऊन इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. या भेटीत सर्वांचे अभिनंदन केले, तसेच देशाला एका विशिष्ट उंचीवर नेण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलंय, असेही मोदींनी यावेळी म्हटले.
इस्रोच्या अनेक शास्त्रज्ञांचे त्यांच्या घरी कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी, शेजारच्यांनी स्वागत, सत्कार केले. आता, इस्रोप्रमुख एस. सोमनाथ यांचे विमानात हटके पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. इंडिगा विमानातून ते प्रवास करत असताना फ्लाईट अटेंडन्सने त्यांच्यासाठी अभिमानाचे शब्द व्यक्त केले. फ्लाईट अटेंडन्सकडून एस. सोमनाथ यांचं करण्यात आलेलं स्वागत एका कॅमेऱ्यात कैद झालं असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
अटेडंटकडून एस. सोमनाथ हे आपल्या फ्लाईटमध्ये आहेत, अशी माहिती देण्यात येते. एअर होस्टेस पूजा शहा यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. देशाच्या नायकांचे आमच्या फ्लाईटमध्ये असणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असेही पूजा यांनी टविटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, चंद्रावर पोहोचलेला भारताचा विक्रम लँडर आता तेथील परिस्थिती माहिती आपल्याला देत आहे. चंद्रावरील अपडेट देताना दररोज नवनवीन माहिती आणि आनंदाच्या गोष्टी आपणास पाहायला मिळत आहेत.