लेह (लडाख) - आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त देशभरात उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, चीनच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या इंडो तिबेटीयन पोलीस दलाच्या जवानांनीही (आयटीबीपी) योग दिनामध्ये सहभाग घेताना लडाखमध्ये समुद्र सपाटीपासून 18 हजार फुटांवर योगसाधना केली. इंडो तिबेटीयन पोलीस दलाच्या जवानांचा योगसाधना करतानाचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला असून, या व्हिडीओमध्ये लडाखमधील बर्फाच्छादित मैदानात आयटीबीपीचे जवान सूर्यनमस्कार घालताना दिसत आहेत.
योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध मान्यवर आणि सर्वसामान्यांनी योगसाधनेमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी योगासनांना सुरुवात करण्याआधी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 'उत्तराखंड कित्येक दशकांपासून योगविद्येचं केंद्र राहिला आहे. त्यामुळे उत्तराखंडच्या दृष्टीनं या दिवसाचं महत्त्व खूप मोठं आहे. संपूर्ण जगात आज योग दिन साजरा होत आहे. भारतीयांच्या दृष्टीनं ही अभिमानाची बाब आहे,' असं मोदी म्हणाले. 'जेव्हा फूट पाडणाऱ्या शक्तींचं सामर्थ्य वाढतं, तेव्हा समाजाच्या घटकांमधील दरी वाढते. समाजात, आयुष्यात जेव्हा तणाव वाढतो, तेव्हा योग सर्वांना जोडतो,' असं प्रतिपादन मोदींनी केलं.