नवी दिल्ली - बिहारमधील एक मुलगी एका पायावर उड्या मारत शाळेत जात असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अशाच एका मुलाची गोष्ट देखील समोर आली आहे. परवेज अहमद हजाम (Parvez Ahmed Hajam) असं या 14 वर्षीय मुलाचं नाव असून तो एका पायावर शाळेत जातो. शाळेत जाताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो पण त्याने हार मानलेली नाही. आपली स्वप्न सत्यात उतरवण्याची त्याच्यामध्ये जिद्द पाहायला मिळत आहे.
परवेज लहान असताना एका भीषण आग दुर्घटनेत त्याने त्याचा डावा पाय गमावला पण त्याने आपली स्वप्ने सोडलेली नाहीत. परवेज सध्या सरकारी हायस्कूल, नौगाम येथे नवव्या वर्गात शिकत आहे. "मी एका पायावर बॅलेन्स करून दररोज सुमारे दोन किलोमीटर जातो. रस्ते चांगले नाहीत. जर मला कृत्रिम अवयव मिळाला तर मी चालू शकेन. मला आयुष्यात खूप काही मिळवायचे आहे. समाजकल्याण विभागाने व्हिलचेअर दिली होती, पण गावातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे ती कधीच वापरली गेली नाही" असं त्याने म्हटलं आहे.
परवेजने दिलेल्या माहितीनुसार, "मी माझ्या शाळेत जाण्यासाठी दररोज 2 किलोमीटर जातो. माझ्या शाळेचा रस्ता खराब झाला आहे. शाळेत पोहोचल्यानंतर मला खूप घाम येतो कारण मला एका पायावर चालणं देखील कठीण होतं. शाळेत पोहोचल्यानंतर मी प्रार्थना करतो. मला क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी आवडतं. मला आशा आहे की सरकार मला माझे भविष्य घडविण्यात मदत करेल. माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे जिद्द आहे"
सरकारला मदत करण्याचं आवाहन
"माझ्या मित्रांना चांगले चालता येते पण मी नीट चालू शकत नाही हे पाहून मला वाईट वाटतं. तथापि, मला शक्ती दिल्याबद्दल मी अल्लाहचे आभार मानतो. मी सरकारला मला मदत करण्याचं आवाहन करतो. मला कृत्रिम अवयव मिळावा किंवा कोणतेही वाहतुकीचे साधन असावे ज्यामुळे माझा शाळेत आणि इतर ठिकाणी प्रवास सुलभ होईल. एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी ऑपरेशन केले ज्यासाठी माझ्या वडिलांना मोठी रक्कम मोजावी लागली. माझ्या उपचारासाठी वडिलांना प्रॉपर्टी विकावी लागली आहे" असं देखील परवेजने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.