नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी पाठींबा दिल्यानंतर आता वेगळेच वळण घेतले आहे. बाहेरच्या व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खूपसू नये असा पलटवार देशातील अनेक सेलिब्रेटींनी केली. त्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar),खासदार गौतम गंभीर, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैनासह अजिंक्य रहाणेचाही समावेश आहे. सर्वांनीच इंडिया टुगेदर या हॅशटॅगने ट्विट केलंय. त्यामुळे, सगळीकडे सेलिब्रिटींच्या ट्विटची आणि शेतकरी आंदोलनाचीच चर्चा आहे. दुसरीकडे संसदेतही शेतकरी आंदोलनाचा मुद्दा गाजत आहे. आज, भाजपा खासदार ज्योतिर्रादित्य शिंदे यांनीही शेतकरी आंदोलनावर शरद पवार यांच्यावर टीका केलीय.
राज्यसभा खासदार ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन करत असताना, शेतकरी आंदोलनावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना लक्ष्य केलंय. शरद पवार हे देशाचे कृषीमंत्री होते, तेव्हा 2010-2011 मध्ये त्यांनी देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. यात कृषी क्षेत्रात खासगी क्षेत्राची भागिदारी गरजेची असून यासाठी एपीएमसी कायद्याचे संशोधन झाले पाहिजे' असं म्हटले होते. शिंदेंनी पवारांच्या त्या पत्राची आठवण करुन देत, ते पत्रच राज्यसभेत वाचून दाखवले. तसेच, काँग्रेसने 2019 च्या जाहीरनाम्यात केलेल्या उल्लेखाचा, आश्वासनाचा पाढाही त्यांनी वाचून दाखवला. तसेच, शरद पवारांवर टाकाही केली. 2010 मध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना शरद पवार यांनी पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी एपीएमसी कायद्याचा उल्लेख केला होता. पण आता ते आपल्याच विधानावरून मागे हटत आहेत. ही सवय आता बदलली पाहिजे, देशासोबत असा खेळ कुठपर्यंत चालणार?, तुम्ही जर तुमच्या निर्णयावर ठाम राहिले तर तुमचा आणखी सन्मान वाढेल, असा टोलाही ज्योतिरादित्य शिंदेंनी पवारांना लगावला.
दरम्यान, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाषणाचे कौतुक करताना, त्यांना चिमटा घेतला. शिंदे हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा आमची चांगली बाजू मांडत होते. तशीच बाजू आज त्यांनी भाजपची मांडली. वाह महाराज, आमचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे' असा टोला सिंह यांनी लगावला.