ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 12 - जम्मू काश्मीरमध्ये एकीकडे दहशतवाद्यांना सामोरं जावं लागत असताना ज्यांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र पहारा देत असतात त्यांच्याकडूनच जवानांना गैरवर्तवणूक मिळत असल्याचं समोर आलं आहे. श्रीनगरमध्ये रस्त्यावर शांतपणे चालत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना छेडतानाचा तसंच मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जवानांना मिळणारी वागणूक पाहता भारतीयांचं रक्त उसळल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावून लढतो तोच आपल्यावर उलटणार असेल तर मग आपला नेमका शत्रू कोण असा प्रश्न जवानांना पडत असेल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या श्रीनगरीमध्ये मतदानावेळी जोरदार हिंसाचार झाला होता. या व्हिडीओत हे जवान मतदान केंद्रावरुन परतत असल्याचं दिसत आहे. यावेळी हे जवान एव्हीएम घेऊन परतत असताना काही तरुण या जवानांवर हल्ला करत हाताने, पायाने मारहाण करत आहेत. तसंच यावेळी विरोधात घोषणाही दिल्या जात असल्याचं ऐकू येत आहे. एका तरुणाने तर जवानाचं हेल्मेटही फेकून दिलं असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
हे सर्व होत असताना भारतीय जवान जे पुर्णपणे सशस्त्र आहेत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे चालत राहणं पसंत केलं. आपल्याकडे असलेले एव्हीएम सुरक्षितपणे पोहोचवणे हा आपला मुख्य हेतू असल्याने इतर कोणत्याही गोष्टीकडे जवानांनी लक्ष दिलं नाही. याउलट त्यांनी हे सर्व संयमणे सहन केलं.
"सध्या जवानांवर पेलेट गनचा वापर केला जात असल्याने वारंवार टीका केली जात आहे. मात्र हा व्हिडीओ लोकांनीच काढला असून त्यांनीच अपलोड केला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत गैरवर्तवणूक होत असल्याचं स्पष्ट दिसत असून जवानांनी प्रतिक्रिया दिलेली नाही", असं सीआरपीएफचे प्रवक्ते भवनेश कुमार यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं आहे.
"जवानांनी एव्हीएमच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी ज्याप्रकारचा संयम दाखवला आहे तो कौतुकास्पद आहे. लोकशाही जिवंत ठेवणे त्यांची प्राथमिकता होती", असंही ते बोलले आहेत. "या व्हिडीओतून जवानांचा संयम दिसतो", असं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर बोलले आहेत.
लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या श्रीनगरीमध्ये मतदानावेळी जोरदार हिंसाचार झाला. अनेक मतदार संघांवर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्ब फेकले गेले. जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलाने विविध भागांमध्ये केलेल्या गोळीबारात आठ जण ठार झाले आहेत. या हिंसाचारामुळे केवळ ६.५ टक्के मतदान झाले आहे.
बडगाम जिल्ह्यात चरार ए शरीफच्या पाखेरपुरा आणि बीरवाह भागात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला. याच जिल्ह्यात चडूरा भागात एक जणाचा, तर मागम भागात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या तणावामुळे तब्बल ७० टक्के मतदान केंद्रांवरील कर्मचारी निघून गेले. या हिंसाचारामध्ये ७० ते १०० जवान जखमी झाल्याचे समजते.