ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 6 - स्थानिक क्रिकेट सामन्याआधी पाकिस्तानची जर्सी परिधान करुन पाकिस्तानी राष्ट्रगीत गाणा-या जम्मू-काश्मीरमधील क्रिकेटपटूंना पोलिसांनी अटक केली आहे. क्लब स्तरावरील क्रिकेट सामन्यात स्थानिक क्रिकेटपटूंनी हे कृत्य केले. ज्यामुळे मोठा वाद उभा राहिला असून, देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर हे क्रिकेटपटू फरार झाल्याचे सांगण्यात येत होते.
2 एप्रिलला मध्य काश्मीरमधील वाईल मैदानावर झालेल्या सामन्यात ही घटना घडली. त्यावेळी फुटीरतवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जम्मू-काश्मीर दौ-याविरोधात बंदचे आवाहन केले होते. पंतप्रधान चीनानी-नाशीरी बोगद्याच्या उदघाटनासाठी राज्यात आले होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. काश्मीरच्या गांदबरल जिल्ह्यातील हा सामना झाला.
बाबा दरयाउद्दीन असं पाकिस्तानची जर्सी परिधान करणा-या संघाचे नाव होते. विरोधी संघ सफेद रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला होता. सामना सुरु होण्याआधी "सन्मानाच्या हेतूने पाकिस्तानी राष्ट्रगीत वाजवलं जाईल" अशी घोषणा लाऊडस्पीकरवरुन करण्यात आली. "आपण वेगळं दिसावं असं आमच्या संघाला वाटत होतं. सोबतच आम्ही काश्मीरचा मुद्दा विसरलेलो नाही याची जाणीव काश्मिरी लोकांना करुन द्यायची होती. यासाठी ही थीम आम्ही निवडली", असं टीमच्या एका सदस्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीखाली सांगितल.
काश्मीरमध्ये अशा प्रकारच्या घटना होणं किंवा दिसणं यामध्ये नवीन असं काही नाही. येथे पाकिस्तान आणि इसीसचे झेंडे फडकवले जात असतात. गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा जवानांवर तरुणांकडून दगडफेक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती ज्यानुसार एका क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये क्रिकेट संघांना दहशतवाद्यांची नावे देण्यात आली होती.