ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - वाढत्या हिंसाचारामुळे दोन दशकांपूर्वी काश्मीर खो-यातील अनेक काश्मिरी पंडितांच्या कुटुंबियांवर विस्थापित होण्याची वेळ आली होती. या घटनेला आज २७ वर्ष उलटली असून त्याच पार्श्वभूमीवर गुणवान अभिनेते आणि तितकेच संवेदनशील व्यक्ती असलेले अनुपम खेर यांनी एका व्हिडीओतून काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडल्या आहेत. खेर हे स्वत:सुद्धा काश्मिरी पंडित असून, आजपर्यंत अनेकवेळा त्यांनी या मुद्यावर भाष्य करत काश्मिरी पंडितांच्या समस्या लोकांसमोर मांडल्या आहेत.
काश्मिरी पंडितांचा आवाज सर्वांपर्यत पोहोचवण्यासाठी खेर यांनी ' फैलेगा हमारा मौन' या कवितेतून खेर यांनी पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही या कवितेचा व्हिडीओ शेअर केला आहे. ' २७ वर्षांनंतरही आम्ही काश्मिरी पंडित आमच्या स्वत:च्याच देशात निर्वासितांप्रमाणे राहात आहोत, हे त्याचबाबतचे अधःपतन आहे’ असेही त्यांनी आपल्आ ट्विटमध्ये नमूद केले आहे. डॉ. शशी शेखर तोषकानी यांनी ही कविता लिहीली असून अशोक पंडित यांनी हा व्हिडीओ दिग्दर्शित केला आहे.
या मुद्यावर खेर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशीही संवाद साधला. ' १९ जानेवारी हा दिवस काही साजरा करण्यात येत नाही. पण त्या दिवशी झालेल्या घटनेच्या स्मरणार्थ, पुन्हा सर्वांचे लक्ष या मुद्याकडे वेधण्यासाठी आम्ही हा (व्हिडीओचा) अनोखा मार्ग अवलंबला आहे. ज्यांना काश्मिरी पंडितांच्या समाजाच्या व्यथा ऐकाव्याश्या वाटत नाहीत त्या लोकांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न आहे' असे त्यांनी नमूद केले.
27yrs on we #KashmiriPandits r stil refugees in our own country. A protest poem about their #SilentScream. Do share. https://t.co/72wRMpL9iS— Anupam Kher (@AnupamPkher) 19 January 2017