भुवनेश्वर: सोशल मीडियावर अनेकदा ट्रेन अपघाताचे किंवा प्रवासी ट्रेनमधून पडल्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाचप्रकारची एक घटना ओडिशातील भुवनेश्वर रेल्वे स्टेशनवर घडली आहे. एका धावत्या ट्रेनमधून उतरताना महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्या घटना घडली. पण, रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) जवानाच्या तत्परतेमुळे महिलेचा जीव वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, घटना काल म्हणजेच 11 मे रोजी भुवनेश्वर रेल्वे स्टेशनवर घडली. प्लॅटफॉर्मवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, महिला धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करते आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकते. तेवढ्यात RPF हेड कॉन्स्टेबल एस मुंडा त्या महिलेचा जीव वाचवतात.
यादरम्यान, दुसरी एक महिलादेखील ट्रेनमधून पडते. पण, सुदैवाने ती महिला ट्रेनपासून थोडी दूर पडल्याने तिला काही होत नाही. यावेळी प्लॅटफॉर्मवर असलेले इतर लोकही तिथे जमा होताना दिसतात. RPF हेड कॉन्स्टेबल एस मुंडा यांच्या समयसूचकतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे.