भारत इंग्रजांच्या जोखडातून १९४७ मध्ये स्वतंत्र झाला होता. यानंतर ३० वर्षांनी भारताने संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी हवेत मारा करू शकणारी मिसाईल बनविण्याच्या प्रकल्पावर सुरुवात केली. तेव्हापासून भारत स्वदेशी शस्त्रास्त्रे बनविण्यावर भर देत आहे. आजचा स्वातंत्र्य दिवस आणखी एका गोष्टीसाठी ओळखला जाईल. मोदी भाषणावेळी म्हणाले या आवाजासाठी माझे कान तरसले होते. कशाचा आवाज? स्वदेशी तोफेचा.
लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच स्वदेशी हॉवित्जर तोफेद्वारे सलामी देण्यात आली. या तोफेचे नाव एडव्हान्स्ड टोड आर्टिलरी गन सिस्टम (Advanced Towed Artillery Gun System- ATAGS) असे आहे. या तोफा DRDO च्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (ARDE), Tata Advanced Systems Limited, Mahindra Defence Naval System आणि Bharat Forge Limited यांनी संयुक्तपणे बनवल्या आहेत. या तोफेची नळी 155 मिमी/52 कॅलिबरची आहे. अलीकडेच राजस्थानमधील पोकरन फील्ड फायरिंग रेंजवर याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
भारतीय लष्कराकडे सध्या या 155 मिमीच्या 7 तोफा आहेत. 40 तोफा मागवण्यात आल्या आहेत. याशिवाय आणखी 150 तोफांची निर्मिती करण्यात येणार आहे. बर्स्ट मोडमध्ये 15 सेकंदात 3 राउंड, इंटेन्समध्ये 3 मिनिटांत 15 राउंड आणि 60 मिनिटांत 60 राउंड फायर होतात. फायरिंग रेंज 48 किमी आहे. ती 52 पर्यंत वाढविण्यात येत आहे.
ATAGS विकसित करण्यासाठी सुमारे चार वर्षे लागली आहेत. 26 जानेवारी 2017 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पहिल्यांदा भारतीयांना दाखविण्यात आली होती.
या तोफेचा आवाज ऐकल्यानंतर मोदींनी आपल्या भाषणात याचा उल्लेख केला. आत्मनिर्भर भारत ही प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक सरकारची आणि समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर हा आवाज ऐकण्यासाठी आमचे कान तरसलेले होते. 75 वर्षांनंतर मेड इन इंडिया तोफेने लाल किल्ल्यावरून तिरंग्याला सलामी दिली, असे मोदी म्हणाले.