भोपाळ - मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी पूरग्रस्त भागात आपला धाडसी बाणा दाखवून दिला. दतिया जिल्ह्यात पुरात अडकलेल्या गावांमधील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर, ते स्वत: हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षितपणे सुखरुप बाहेर पडले. या कामी वायूदलाची त्यांना मोठी मदत झाली. ज्या मोटारबोटच्या सहाय्याने मिश्रा गावात पोहोचले होते, त्या मोटारबोटीवर झाड कोसळले होते. त्यामुळे एक तार फसल्याने ती बोट पाण्यातच बंद पडली होती. दतिया जिल्ह्यातील गावात मदत व बचाव कार्यासाठी गेलेले गृहमंत्री स्वत:च अडकून पडले होते. त्यामुळे, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना एअरलिफ्ट करण्यात आले. तसेच, तेथे फसलेल्या नागरिकांनाही एअरलिफ्ट करण्यात आले. कोटरा गाव आणि त्याजवळीलच गोरा चौकी भागात काही लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली होती, असे पोलीस अधीक्षक अमनसिंह राठोड यांनी सांगितलं.
गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा हे स्वत: बोट घेऊन त्याठिकाणी पोहोचले होते. मात्र, या बोटीत एवढे लोकं नेणं धोक्याचं असल्याने गृहमंत्र्यांनी हेलिकॉप्टर बोलावले होते. हेलिकॉप्टर आल्यानंतर गृहमंत्र्यांनी सर्वप्रथम पुरात अडकलेल्या 7 लोकांना एअरलिफ्ट केले. त्यानंतर, ते स्वत: वायू दलाच्या जवानांच्या मदतीने सुखरुपपणे पाण्यातून बाहेर निघाले. यावेळी, गृहमंत्र्यांसमोरच एक वयोवृद्ध आजोबा मोठमोठ्याने रडू लागले होते. त्यावेळी, तुम्हाला आधी बाहेर काढेल, त्यानंतरच मी बाहेर जाईल, असा विश्वास डॉ. मिश्रा यांनी त्या आजोबांना दिला. त्यानुसार, कृतीही केली, असे गृहमंत्र्यांचे सचिव भगवत साहू यांनी सांगितलं. दरम्यान, गृहमंत्र्यांच्या या धाडसी बाण्याचे सध्या सोशल मीडियातून कौतुक होत आहे.