Anand Mahindra : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा आपल्या शक्तिशाली स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल्स (SUV) साठी ओळखली जाते. महिंद्रा बोलेरो(Mahindra Bolero) कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही असून, गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ही एसयूव्ही जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर धावताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही महिंद्रा बोलेरो चक्क रेल्वे रुळावर धावत आहे. हा व्हिडिओ पाहून आनंद महिंद्रा देखील आश्चर्यचकित झाले आहेत.
हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये महिंद्रा बोलेरो एसयूव्ही काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधण्यात येत असलेल्या बांधकामाधीन पुलावर सर्वेक्षण वाहन म्हणून चालवली जात असल्याचे दिसत आहे. हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे, ज्याचे बांधकाम सध्या सुरू आहे. या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेली बोलेरो एसयूव्ही रेल्वे ट्रॅकवर सर्व्हे कार म्हणून कस्टमाइज करण्यात आली आहे. एसयूव्हीला ट्रॅकवर आणण्यासाठी खास प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.
काश्मीरमधील चिनाब पूल नदीपात्रापासून 359 मीटर उंचीवर आहे. यावरुन तुम्ही उंचीचा अंदाज लावू शकता की, हा पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे. हा व्हिडिओ राजेंद्र बी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना आनंद महिंद्रा म्हणाले की बोलेरोची क्षमता नवीन उंची गाठत आहे. "महिंद्राच्या संस्थापकांनी स्वतंत्र भारतात ऑफ-रोड वाहने बनवण्याचा निर्णय का घेतला हे स्पष्ट होते. जिथे रस्ता नव्हता तिथे जाण्यासाठी गाड्या बनवल्या,"' असे आनंद महिंद्रा म्हणाले.
महिंद्रा बोलेरो कशी आहे:महिंद्र बोलेरो अनेक दशकांपासून भारतीय बाजारपेठेत चमकदार कामगिरी करत आहे. या गाडीची किंमत 9.78 लाखांपासून सुरू होते. कंपनीने यात 1.5-लिटर डिझेल इंजिन वापरले आहे, जे 75PS ची पॉवर आणि 210Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. SUV मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मॅन्युअल AC, AUX आणि USB कनेक्टिव्हिटीसह ब्लूटूथ-सक्षम म्युझिक सिस्टीम, पॉवर विंडो आणि पॉवर स्टीयरिंग यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.