पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (29 मार्च) भाजपवर जोरदार निशाणा साधला. यासाठी त्यांनी एक अनोखा मार्ग अवलंबला. यावेळी त्यांनी वॉशिंग मशीनसह धरणे दिले. कोलकात्यात तृणमूल काँग्रेसने व्यासपीठावर प्रतिकात्मक वॉशिंग मशीन लावले होते. याला त्यांनी भाजपचे वॉशिंग मशीन, असे नाव दिले होते.
यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यात काळे कपडे टाकून पांढरे कपडे काढले. खरे तर, मुख्यमंत्री ममता आणि त्यांच्या पक्षाकडून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे की, 'भाजपच्या राजवटीत केंद्रीय एजन्सींकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला जातो. मात्र ते भाजपमध्ये गेले की, निर्दोष ठरतात. यासंदर्भातील व्हिडिओही टीएमसीने ट्विट केला आहे. तसेच, ही 'भाजपच्या वॉशिंग मशीनची जादू' असल्याचेही यावेळी म्हणण्यात आले. यावेळी टीएमसी कार्यकर्त्यांनी 'वॉशिंग मशीन...भाजप' अशी घोषणाबाजीही केली.
भाजपवर CM ममतांचा निशाणा -माध्यमांतील वृत्तांनुसार, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात दोन दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले आहेत. ममता बॅनर्जी म्हणाल्या, "भाजप वॉशिंग मशीन बनले आहे. चोर, दरोडेखोरांची यादी काढा, ते सगळे तिथे (भाजपमध्ये) बसले आहेत. मला संविधानाबद्दल त्यांचे प्रवचन ऐकायचे आहे?" सीएम ममता म्हणाल्या, "मला धरणे देण्याचा पूर्ण अधिकार आहे. गरज पडल्यास मी पंतप्रधानांच्या निवासस्थानीही धरणे देईन.