पंजाबमधील मोहाली येथील कुराली येथील एका केमिकल फॅक्ट्रीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 7 ते 8 जण भाजल्याचं म्हटलं जात आहे. मोहाली आणि रोपर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या दोन शहरांमधून रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची टीमही पोहोचली आहे.
पोलीस अधिकारी आणि अग्निशमन गाड्या घटनास्थळी हजर आहेत. ज्या ठिकाणी आग लागली त्याच्या शेजारी देखील एक केमिकल फॅक्ट्री आहे. तेथेही आग लागल्यास मोठे नुकसान होऊ शकतं.
आग लागल्यानंतर आतापर्यंत 5 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना मोहालीतील 6 फेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. फॅक्ट्रीला लागलेली आग इतकी भीषण आहे की आतील केमिकलचा सतत स्फोट होत आहे.
या अपघातानंतर केमिकल फॅक्टरीचे दोन व्हिडिओही समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये आगीच्या ज्वाळा उठताना दिसत आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.