ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - बाईचा मेंदू हा कसा विनोदाचा विषय आहे, हे ठसविण्यासाठी पुरुषजातीनं आपला मेंदू निगुतीनं खर्च केला. मेंदूचं काम लिंगभेदानुसार वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतो का, त्यात गुणवत्तेच्या निकषावर खरंच डावं-उजवं असं काही असतं का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं गमतीदार अंगानं करणारा 'मेन्स ब्रेन व्हर्सेस वुमन्स ब्रेन' हा व्हिडिओ सध्या जगभरात व्हायरल झाला आहे.
'मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन फ्रॉम व्हीनस'... असं नेहमी म्हटलं जातं. पुरूष व महिला यांच्या जगण्याच्या, वागण्याच्या व विचारपद्धती अतिशय वेगळ्या असून त्याचं पार्श्वभूमीवर हे वाक्य सर्रास वापरलं जातं. स्त्रियांच्या डोक्यात एकाचवेळेस अनेक विचार सुरू असतात, त्या एकाचवेळी अनेक कामे (मल्टिटास्किंग) लीलया पार पाडू शकतात. पुरूष मात्र कोणत्याही गोष्टीचा जास्त स्ट्रेस न घेता, शांत व संतुलितपणे निर्णय घेतात. त्यांच्या स्वभावातील हाच फरक कधीकधी एकमेकांसाठी पूरक ठरतो, मात्र कधीतरी याचवरून दोघांचे खटकेही उडू शकतात.
पुरूष व स्त्रियांच्या वागण्यातील हा फरक नेमका कशामुळे, आजच्या आधुनिक युगात एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून चालणारे, स्पर्धा करणारे हेच स्त्री-पुरूश एखाद्या परिस्थितीत वेगवेगळ्या पद्धतीने रिअॅक्ट कसे होतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. लग्नसंस्था, कुटुंबव्यवस्था या माणसाच्या जिव्हाळ्याच्या पण महत्वपूर्ण विषयांवर गेल्या अनेक वर्षांपासून मार्क गन्गर खेळीमेळीने, विनोदी पद्धतीने भाष्य करतात. 'मेन्स ब्रेन व्हर्सेस वुमन्स ब्रेन' हा त्यांच्या व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये गन्गर यांनी पुरूष व महिलांच्या मेंदूची रचना व त्यावरून त्यांची विचारक्षमता यावर गमतीदार भाष्य केले आहे.