छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक दैदीप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. राज्यात सर्वत्र शिवजयंती अतिशय उत्साहाने साजरी केली जात आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. यामध्ये "छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप , त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे" असं मोदींनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी एक खास व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवजयंती निमित्त ट्विट केलं आहे. "छत्रपती शिवाजी महाराज जयंती... अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज श्री #छत्रपती #शिवाजी_महाराज यांना जयंती दिनी त्रिवार सलाम" असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा करत सर्वांना शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहे. "यशवंत कीर्तीवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा || हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, आमचे जाणते राजे, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा! सर्वांना शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा! छत्रपती शिवाजी महाराज की जय!" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.