अहमदाबाद - काँग्रेस नेते आणि पंजाबमधील मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना त्यांच्या होमपीचमध्ये टीकेचं लक्ष्य केलं आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे नवजोत सिंग सिद्धू यांनी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. त्यामध्ये नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधानांवर टीका करताना म्हणाले आहे की, मोदी सांगतात मी फकीर आहे, मी स्वयंसेवक आहे, मी चौकीदार आहे पण तुम्ही हे का सांगत नाही मी पंतप्रधान आहे. मी ठामपणे सांगतो मोदी चोर आहेत अशी घणाघाती टीका नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. अहमदाबादमधील धोलका येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
त्याचसोबत जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी खुली चर्चा करावी तर मी चुकीचं ठरलो तर जलसमाधी घेईन असं आव्हान नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं. ज्या महात्मा गांधी यांनी नेहमी सत्य बोला असा विचार दिला त्याच मातीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा थापेबाज माणूस जन्माला आला अशी टीकाही नवजोत सिंग सिद्धू यांनी केली.
२०१४ साली नरेंद्र मोदी देशाला जगात सर्वश्रेष्ठ बनविण्याच्या नावाखाली सत्तेवर आले मात्र आज ते सर्वांना चौकीदार बनवत आहेत. लोकशाही आज गुंडशाही झाली आहे. जे मोदींची भक्ती करतील ते देशभक्त आणि त्यांचा विरोध करतील ते देशद्रोही ठरतात. आम्हाला पंतप्रधान आणि भाजपाच्या समर्थकांकडून देशभक्तीचं प्रमाणपत्र नको असा टोलाही नवजोत सिंग सिद्धू यांनी लगावला. इथे लोकांच्या एकवेळ जेवण मिळत नाही. उपाशी पोटी तुम्ही लोकांना योगा करायला सांगता? सर्वांना बाबा रामदेव बनवायचा आहे का? लोकांचे खिसे रिकामे अन् खाते उघडले जात आहेत असा चिमटा नवजोत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या खास शैलीत काढला.
काल झालेल्या बिहार येथील जाहीर सभेतही नवजोत सिंग सिद्धू यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त विधान केले होते. जातीपातीच्या राजकारणात तुम्हाला गुंतवून ठेवलं आहे. मुस्लिमांनी एकगठ्ठा मतदान काँग्रेसला केलं तर मोदींचा पराभव निश्चित होऊ शकतो. ज्या मतदारसंघात तुम्ही अल्पसंख्याक म्हणून आहात त्याच मतदारसंघात तुम्ही एकजूट आला तर बहुसंख्याक होऊ शकता असं नवजोत सिंग सिद्धू यांनी सांगितले होते. भाजपावाले मुस्लिम मतांमध्ये फूट पाडण्यासाठी औवेसीसारख्या एमआयएमला ताकद देत आहेत.