Video - पैसे वाटूनही सरपंचपदाची निवडणूक हरले, जनतेला धमकावून केली लाखोंची वसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 08:30 AM2022-07-13T08:30:21+5:302022-07-13T08:37:30+5:30
निवडणूक हरल्यानंतर मतदारांकडून पैसे वसूल केल्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. नीमच जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
नवी दिल्ली - निवडणुकीच्या आधी लोकांना पैशाचं अमिष दाखवलं जातं. वेगवगेळी प्रलोभनं देऊन त्यांच्याकडे मत मागितल्याचे अनेक व्हिडीओ हे याआधी समोर आले आहेत. पण असं असताना आता मध्य प्रदेशमधून एक अजब प्रकार समोर आला आहे. निवडणूक हरल्यानंतर मतदारांकडून पैसे वसूल केल्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. नीमच जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरपंच पदाच्या मेदवाराविरोधीत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीमच जिल्ह्यातील मनासा जनपदअंतर्गत ग्राम पंचायत देवरानमधील सरपंच पदाचे उमेदवार राजू दायमा यांचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही लोक गावकऱ्यांच्या घराचं दार ठोकावून त्यांच्याकडून पैसे वसूल करताना दिसत आहे. काही जणांना मारहाण करण्यात आली तर काहींना धमकी देऊन पैसे वसूल करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळत आहे.
चुनाव का एक अन्दाज़ ये भी एमपी के नीमच जिले में जब सरपंच उम्मीदवार पैसे बाँटने के बाद हार गया तो गाँव में पैसा वसूली के लिये निकला. जब वोट नहीं दिया तो पैसा वापस करो. #Election#MadhayPradeshpic.twitter.com/BRVRwP23cz
— Brajesh Rajput (@brajeshabpnews) July 12, 2022
चश्मा या निवडणुकीच्या चिन्हाअंतर्गत निवडणूक लढवणाऱ्या दायमा यांनी पैसे वाटून मतदारांना प्रलोभन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीत दुसराच उमेदवार जिंकला. वीरेंद्र पाटीदार यांचा विजय झाला तर राजू दायमा यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर राजू आणि त्यांचे समर्थक संतापले. यानंतर गावात जाऊन मतदारांना धमकी देत त्यांच्याकडून पैसे वसूल करू लागले.
राजू दायमा आपल्या काही साथीदारांना घेऊन लोकांच्या घरी पोहोचले. तिथे त्यांच्यकडे जबरदस्तीने पैसे मागू लागले. काही लोकांना त्यांनी शिवीगाळ केली. तर काहींना धमकावलं. याचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अवघ्या तासाभरात त्यांनी तब्बल चार लाख रुपये वसूल केले. व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओची दखल घेत आरोपी राजू दायमाविरोधात मारहाण, धमकी देणे आदी गुन्हा दाखल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.