राम मंदिराच्या छताला गळती लागल्याचा प्रकार ताजाच असताना नव्या संसदेतील एक व्हिडीओ विरोधकांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. नव्या संसदेच्या छताला गळती लागल्याने खाली ते पाणी साठविण्यासाठी मोठा ड्रम ठेवण्यात आला आहे. हा व्हिडीओ काँग्रेसच्या खासदाराने शेअर केला असून बाहेर पेपर लीक, आत छत लीक, असे कॅप्शन देत टीका केली आहे.
तामिळनाडूचे विरुधुनगरचे खासदार मणिकम टागोर यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला होता. तो व्हायरल होऊ लागला असून सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील या व्हिडीओवरून मोदी सरकारवर टीका केली आहे.
राष्ट्रपतींच्या वापरासाठी असलेल्या संसद लॉबीमध्ये ही गळती होत आहे. दिल्लीत मोठा पाऊस पडत आहे. नवी संसद बांधून एक वर्ष झाले आहे, तरीही गळती लागल्याने काँग्रेसने लोकसभेत स्थगन प्रस्ताव आणणार आहे, असे टागोर यांनी म्हटले आहे.
तर सपाचे अखिलेश यादव यांनी नव्या संसदेपेक्षा जुनीच संसद खूप चांगली होती. तिथे जुने खासदार देखील येऊन भेटू शकत होते. जोपर्यंत अब्जावधी खर्चून बांधलेल्या संसदेतून पाणी टपकण्याचा कार्यक्रम पूर्ण होत नाही तोवर आपण का नाही जुन्या संसदेत जाऊया, असा उपरोधिक टोला अखिलेश यांनी हाणला आहे. याहून पुढे जात अखिलेश यांनी भाजपाला टोला लगावला आहे. भाजपा सरकारने बनविलेल्या प्रत्येक नव्या छताला गळती लागणे हे मुद्दामहून विचार करून केलेल्या डिझाईनचा भाग तर नाहीय ना की... असे जनता विचारत असल्याचे त्यांनी म्हटले.
बुधवारी दिल्लीमध्ये तुफान पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागाला तलावाचे स्वरूप आले आहे. गुरुवार उजाडला तरी रस्त्यावरचे पाणी काही कमी झालेले नाही. आज पाऊस प़डला तर दिल्लीत पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या लखनौमधील विधानसभेत पावसाचे पाणी साचल्याचे व्हिडीओ आलेले आहेत.