नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक मन सुन्न करणारी घटना आता समोर आली आहे. रुग्णवाहिकेसाठी रुग्णालयाने भरपूर पैसे मागितले. शेवटी वडिलांवर बाईकवरून 90 किलोमीटर प्रवास करून मुलाचा मृतदेह घरी आणण्याची वेळ आली आहे. आंध्र प्रदेशच्या तिरुपतीमधील एका सरकारी रुग्णालयात रुग्णवाहिका न मिळाल्याने एका हतबल पित्याला आपल्या लेकाचा मृतदेह हा बाईकवरून आणावा लागला. श्री वेंकटेश्वर रामनारायण रुईया रुग्णालयात ही संतापजनक घटना घ़डली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान मुलाचा रुग्णालयातच मृत्यू झाला. यानंतर मृतदेह आपल्या गावी घेऊन जाण्यासाठी वडिलांनी रुग्णालयाकडे रुग्णवाहिकेसाठी विचारपूस केली पण त्यांना रुग्णवाहिका मिळालीच नाही. एका न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात उपस्थित असलेला स्टाफ आणि रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने मृतदेह घेऊन जाण्यासाठी मोठी रक्कम मागितली. तसेच बाहेरून दुसरी एखादी रुग्णवाहिका आणण्यास मनाई केली. पैसे नसल्यामुळे हतबल झालेल्या एका पित्याने बाईकवरून मृतदेह घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
वडिलांनी बाईकवरून मृतदेह अन्नामया जिल्ह्यातील चितवेल मंडळ येथील आपल्या गावी आणला. हे गाव रुग्णालयापासून तब्बल 90 किलोमीटरवर आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यानंतरच रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार सर्वांसमोर आला. रुग्णालयाच्या सुप्रिटेंडेंट डॉ. भारती यांनी रुग्णालयात नाईट ड्यूटीवर असलेले सर्व कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना बोलावून घेतले आहे. तसेच याप्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन तपास सुरू केल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.