बंगळुरू - कोरोनाचं संकट दूर व्हावं म्हणून कुणी होम-हवन करतंय, तर कुणी देवाला नवस बोलतंय. विज्ञानापासून ते अध्यात्मापर्यंत कोरोनामुक्तीसाठी संघर्ष आणि प्रार्थना सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कर्नाटकच्याबेळगावमध्ये कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देवाला घोडा सोडण्यात आला होता. मात्र, या घोड्याचाच मृत्यू झाला असून घोड्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हजारों नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. या गर्दीत कोरोनाचे नियमांचा फज्जा उडाल्याचंही दिसून आलं.
कोरोनाला रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेपासून ते गावच्या ग्रामपंचायतीपर्यंत सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र, नागरिकांना कोरोनाचं गांभीर्य नसल्याचं दिसत आहे. कोरोना नियमा पाळण्याऐवजी नियमांचे उल्लंघन करण्यातच काहीजण आघाडीवर असतात. कर्नाटकच्या गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावातील मरडीमठ येथे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देवाला घोडा सोडण्यात आला होता. या घोड्याच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महास्वामींच्या मार्गदर्शनात सोडला घोडा
बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील मरडीमठात पवाडेश्वर महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हा घोडा सोडला होता. बुधवारी मध्यरात्री 12 ते गुरुवारी सकाळी 4 वाजेपर्यंत हा घोडा सोडण्यात आला. दैवी घोडा कोरोना व्हायरसपासून रक्षण करण्यासाठी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, दुर्दैवाने या घोड्याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर, अंत्यसंस्कारासाठी गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. विधिवत पद्धतीने या घोड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.