नवी दिल्ली - ओडिशातील कालाहांडी जिल्ह्यात मन सुन्न करणारी एक घटना घडली आहे. जिल्ह्यातील गोलमुंडा ब्लॉकमधील बेहेरागुडा गावात काही लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी नाला पार करावा लागला. धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नाही तसेच अन्य कोणताही मार्ग नसल्याने त्यांनी खराब पाण्यात उतरुन हा नाला ओलांडला. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना कुटुंबीयांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. या भयंकर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
ओडिशामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. बेहेरागुडा गावात असलेल्या या नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर आल्याने लोकांची ये-जा करणं अत्यंत कठीण झालं आहे. अशा स्थितीत त्या भागातील सांता राणा नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सांता राणाचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाईकांना हा नाला पार करावा लागला. व्हायरल व्हिडीओमध्ये कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कारासाठी मृतदेह खांद्यावर घेऊन जात आहेत. त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आलं आहे. अशा परिस्थितीमध्येही मृतदेह घेऊन जात आहेत.
स्मशानभूमी ही नाल्याच्या दुसऱ्या बाजूला आहे. तिथे जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्याने कुटुंबावर ही वेळ आली आहे. पावसाचं पाणी मृतदेहावर पडू नये म्हणून कुटुंबियांनी केळीच्या पानांचा आधार घेतला आहे. ओडिशा सरकारने 4 वर्षांपूर्वी एक योजना आणली होती. ज्यामध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबाला अंत्यसंस्कारासाठी 2 हजार रुपये मिळणार असं आश्वासन दिलं होतं. मात्र या योजनेबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.