Manipur CM Convoy Attack Update: गेल्या वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेकांचा मृत्यूदेखील झाला. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही देखील घडल्या. अशातच मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर सोमवारी अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला. या हल्ल्याचा हादरवणारा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.
सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचा ताफा इम्फाळहून तणावग्रस्त जिरीबामला जिल्ह्यात जात असताना राष्ट्रीय महामार्ग-३७ वर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मणिपूर पोलिसांचा एक सुरक्षा कर्मचारी आणि एक सिव्हिल चालक जखमी झाला. या हल्ल्याचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. व्हिडीओमध्ये गोळीबाराच आवाज ऐकू येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गोळीबाराचा प्रचंड आवाज ऐकू येत आहे. तर पाठीमागे एक माणूस ओरडताना दिसत आहे. दुसरीकडे हल्ल्यानंतर सुरक्षा दलांवर गोळीबार झाल्यानंतर त्यांच्याकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील कोटलाने गावाजवळ गोळीबाराचा आवाज ऐकू येत असल्याचे सुरक्षा दलाने सांगितले. गेल्या सहा महिन्यांत मुख्यमंत्री कार्यालयाकडून अनेक इशारे देऊनही मणिपूर पोलीस माहितीवर कारवाई करण्यात किंवा हिंसाचाराच्या घटना रोखण्यात अपयशी ठरले आहेत.
मणिपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून २०२४ रोजी, मुख्यमंत्र्यांच्या विशेष सुरक्षा पथकावर, कांगपोकपी जिल्ह्यातील कोटलाने जवळील सिनम गावात संशयित कुकी अतिरेक्यांनी हल्ला केला. यामध्ये मणिपूर पोलिसांचा एक जवान आणि एक नागरिक चालक जखमी झाला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि दोन जखमींना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी नेले.
दरम्यान, या भागात हिंसाचार वाढत असताना मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकावर हल्ला झाला. ६ जून रोजी हिंसाचारात वाढ झाली. अज्ञात हल्लेखोरांनी जिरीबामध्ये एका ५९ वर्षीय व्यक्तीची हत्या केली. गेल्या आठवड्यात शेतकरी सोइबाम सरतकुमार सिंह यांचा मृतदेह सापडला होता जे अनेक आठवड्यांपासून बेपत्ता होते. सिंह यांचा मृतदेह जिरीबाममध्ये सापडल्यानंतर त्यानंतर जिरीबाममध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु झाला. काही सरकारी कार्यालयांसह सुमारे ७० घरांना आग लावण्यात आल्यानंतर आणि शेकडो नागरिकांनी तिथून पळ काढला. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.