नवी दिल्ली-
राज्यात हिवाळी अधिवेशनात तर दिल्लीत लोकसभेत ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर उभा ठाकला आहे. लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियान मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप केले. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात वाद झाला. याचे पडसाद राज्यात हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले. दोन्ही गटाचे आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले. सभागृहात एकमेकांवर आरोप करणारे दोन्ही गटाचे खासदार मात्र दिल्लीत एकाच कार्यालयात एकत्र आल्याचाही एक व्हिडिओ आता समोर आला आहे.
दिल्लीत हिवाळी अधिवेशन सुरू असून लोकसभेत राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राहुल शेवाळेंवर घणाघाती टीका केली. तसंच राहुल शेवाळेंनी आधी स्वत:चं चारित्र्य तपासावं असा निशाणाही साधला. आदित्य ठाकरेंवर आरोप केल्यानं राऊत शेवाळे यांच्यावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. पण संसदेच्या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात हेच खासदार एकत्र पाहायला मिळाले. अर्थात राऊत आणि शेवाळेंमध्ये यावेळी अबोला पाहायला मिळाला.
पक्षात फूट पण कार्यालय एकचशिवसेनेत फूट पडून शिंदे आणि ठाकरे गट निर्माण झाला असला तरी दिल्लीतील संसदेत शिवसेनेचं पक्ष कार्यालय अजूनही एकच आहे. त्यामुळे दोन्ही गटाच्या खासदारांना एकाच कार्यालयात बसावं लागत आहे. नव्या संसदेचं काम अद्याप सुरू असल्यानं दोन्ही गटांना दिल्लीत वेगवेगळं कार्यालय देण्यात आलेलं नाही.
खासदार राहुल शेवाळेंच्या SIT चौकशीचे आदेश, उपसभापती निलम गोऱ्हेंची घोषणा
व्हिडिओमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार एकाच कार्यालयात बसलेले पाहायला मिळत आहे. यात राहुल शेवाळे, संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियांका चतुर्वेदी आणि आणखी दोन खासदार पाहायला मिळत आहेत. एकत्र दिसत असले तरी दोन्ही गटाच्या खासदारांमध्ये अबोला दिसून आला.