ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - अभिनेते ओम पुरी यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करणा-या पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांनी पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. ओम पुरी यांचा आत्मा अनेक दिवसांपासून मुंबईच्या रस्त्यांवर भटकत आहे असा दावा पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीने केला आहे. ओम पुरी यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदींनी पुरी यांचा खून केला असा हास्यास्पद दावाही पाकिस्तानी माध्यमांनी केला होता.
पाकिस्तानच्या एका वृत्त वाहिनीचे न्यूज एंकर आमिर लियाकत यांनी ओम पुरी यांचा आत्मा अनेक दिवसांपासून मुंबईच्या रस्त्यांवर भटकत आहे असं म्हटलं आहे. ओम पुरी यांचा आत्मा काही दिवसांपासून ज्या रहिवाशी इमारतीत ते राहात होते तेथे भटकत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही ओम पुरी यांचीच सावली असून आपल्या खुन्यांचा म्हणजे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा ती सावली शोध घेत असल्याचं लियाकत म्हणाले.
हा व्हिडीओ भारतातही चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी मीडियाने यामध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही ओढण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ पाहून तो जुना असल्याचं लगेच लक्षात येतं, शिवाय व्हिडीओमध्ये जे ठिकाण ओम पुरींची सोसायटी म्हणून सांगितलं जातंय तेही वेगळंच आहे.
6 जानेवारी 2017 रोजी झाला होता मृत्यू-
भारदस्त आवाज, पल्लेदार संवादफेक आणि कसदार अभिनयाने रुपेरी पडद्यावर दीर्घकाळ आपली छाप उमटविणारा ओम पुरी नावाचा चंदेरी दुनियेचा लखलखता तारा 6 जानेवारी 2017 रोजी अचानक काळाच्या पडद्याआड लुप्त झाला. 6 जानेवारीला सकाळी हृदयविकाराने ओम पुरी यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी नंदिता आणि मुलगा ईशान असा परिवार आहे.‘घाशीराम कोतवाल’ या नाटकावर आधारित मराठी चित्रपटातून सुरू केलेल्या चंदेरी प्रवासात त्यांनी बॉलीवूडसोबतच हॉलीवूडपर्यंतचा टप्पा गाठला. देखण्या व्यक्तिमत्त्वाचे वरदान नसताना कसदार अभिनयाच्या जोरावर अर्धसत्य, आक्रोश यांसारखे चित्रपट, तमस, भारत एक खोज, कक्काजी कहीन आदी मालिकांमुळे ते घराघरांत पोहोचले.