- ऑनलाइन लोकमत
बरेली, दि. 26 - मुल जन्माला आल्यावर सर्वात प्रथम जिच्यावर ते विश्वास ठेवतं ती व्यक्ती म्हणजे आई. आईदेखील आपल्या मुलाचं प्रत्येक संकटापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण आई या नात्यावरुन विश्वास उठवणारी धक्कादायक घटना बरेलीमध्ये घडली आहे. दीड वर्षाच्या चिमुरड्याला त्याच्याच आईकडून अमानुषपणे मारहाण केली जात असल्याचं उघड झालं आहे. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
या महिलेचं नाव पूनम असून पतीसोबत बिघडलेल्या संबंधांमुळेच ती अशी वागत होती अशी माहिती मिळाली आहे. सीसीव्हीमध्ये ही महिला आपल्या बाळाला बेडवर आदळताना दिसत आहे. त्याला मारहाणदेखील करत आहे. लहान मुलं मात्र जिच्याकडे मदत मागायची तिच मारहाण करत असल्याने असहाय्यपणे रडताना दिसत आहे.
एखादी आई इतकी क्रूर कशी काय वागू शकते हा प्रश्न व्हिडीओ पाहिल्यावर पडतो. विशेष म्हणजे आपली पत्नी बाळाला मारहाण करत असल्याचा संशय आल्याने पतीनेच घरात सीसीटीव्ही बसवले होते. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या निर्दयी आणि क्रूर आईवर कारवाई करण्यात आली आहे.