नवी दिल्ली - मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी आनंद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे चक्क इंग्रजीत रामदास आठवेंनी अर्थसंकल्पासंदर्भात आपली प्रतिक्रिया राज्यसभा टीव्ही या चॅनेलला दिली. मोदी सरकारने सादर केलेलं 2019-20 बजेट हे अतिशय महत्वाचं बजेट असून बेस्ट बजेट, नाईस बजेट असल्याचं आठवले यांनी म्हटलंय.
अर्थमंत्री पियुष गोयल यांनी यंदाचा 2019-20 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांना खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. तर, शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये देण्याची घोषणाही सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह विरोधकांनी मोदींच्या अर्थसंकल्पावर टीका केली. मात्र, मोदींच्या सहकारी मंत्र्यानी या बजेटचे कौतुक केलं आहे. केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मोदी सरकारच्या बजेटला व्हेरी नाईस, व्हेरी इंपोर्टंट, व्हेरी बेस्ट बजेट असल्याच म्हटलंय. तसेच मध्यमवर्गीयांसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईब नागरिकांसाठी हे बजेट उत्कृष्ट आहे. यंदाचे बजेट म्हणजे राहुल गांधी आणि विरोधकांना मोठं आव्हान असून आगामी लोकसभा निवडणुकींमध्ये मोदींना विजयी करण्यात हे बजेट महत्वाचं ठरणार असल्याचंही रामदास आठवलेंनी म्हटलंय. मी आणि माझा पक्ष या बजेटल पाठींबा देत असून मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी हे बजेट महत्वाची भूमिका बजावेल, असेही आठवले यांनी म्हटले.