ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 23 - सीमेवर कुरापती काढणा-या पाकिस्तानला भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकवला आहे. जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीला मदत करणा-या पाकिस्तानी चौक्या भारतीय लष्कराने कारवाई करुन उद्ध्वस्त केल्या आहेत. मेजर जनरल अशोक नरुला यांनी प्रसारमाध्यमांना कारवाईची माहिती देताना कारवाईचा व्हिडीओही सार्वजनिक केला.
30 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणा-या चौक्या लष्कराने तोफगोळयाच्या वर्षाव करुन उद्ध्वस्त केल्या. दहशतवादविरोधी रणनितीअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. सीमेवर घुसखोरीला मदत करणा-या पोस्टसवर वेळोवेळी अशा प्रकारची कारवाई केली जाते अशी माहिती मेजर नरुला यांनी दिली.
आणखी वाचा
घुसखोरीला मदत केली तर अशाच प्रकारची कारवाई यापुढेही केली जाईल असा संदेश लष्कराने दिला आहे. भारताची ही कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक नाहीय. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारताने सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा भारतीय लष्कराच्या विशेष कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. यावेळी भारतीय सैन्याने आपल्याच हद्दीतच राहून जोरदार गोळीबार आणि तोफगोळयांचा वर्षाव केला. ज्यामध्ये पाकिस्तानी चौक्या आणि त्यांचे बंकर उद्ध्वस्त झाले.
नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्य भारतीय जवानांना गोळीबारामध्ये गुंतवून ठेवते. त्यामुळे दहशतवाद्यांना घुसखोरी करणे सोपे जाते. घुसखोरी करताना हे दहशतवादी गावक-यांवरही हल्ला करायला मागे पुढे पाहत नाहीत असे मेजर नरुला यांनी सांगितले. बर्फ वितळण्यास सुरुवात झाल्यानंतर काश्मीरमध्ये घुसखोरीच्या घटना वाढतात.
वाढत्या दहशतवादामुळे राज्यातील तरुणांवर चुकीच्या गोष्टींचा प्रभाव वाढत असल्याने अशा प्रकारची कारवाई आवश्यक होती. 21 मे रोजी लष्कराने उत्तर काश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरीचा कट उधळून लावताना चार दहशतवाद्यांना ठार मारले होते. यावेळी दोन जवानही शहीद झाले होते. 1 मे रोजी पाकिस्तानी कमांडोंनी भारतीय हद्दीत घुसखोरी करुन गस्तीवर असणा-या जवानांवर हल्ला केला होता. यावेळी त्यांनी दोन भारतीय जवानांना मारुन त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली होती.