नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या ओबीसी एकता मंचाचे नेते अल्पेश ठाकोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक विधान करून नव्या वादाला तोंड फोडलं होतं. मोदी माझ्याप्रमाणे रंगाने काळे होते पण गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून दरदिवशी तैवान येथील मशरूम खायला सुरूवात केली आणि ते गोरे झाले असं विधान मंगळवारी गुजरात निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी एका रॅलीमध्ये अल्पेश ठाकोर यांनी केलं होतं. मोदी दरदिवसाला 4 लाख रूपयांचे मशरूम खातात त्यामुळे त्यांना गरिबांचं जेवण आवडत नाही असं अल्पेश ठाकोर म्हणाले होते.
अल्पेश ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर भाजपादेखील प्रत्युत्तर देत आहे. पण यावेळी थेट तैवानमधूनच एका महिलेने व्हिडीओच्या माध्यमातून अल्पेश ठाकोर यांना उत्तर दिलं असून आपलं मत मांडलं आहे. तुमच्या देशातील राजकारणात तैवानला घुसवू नका, असा सल्लाच या महिलेने दिला आहे. भाजपाचे दिल्ली प्रवक्ता तेजिंदर बग्गा यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘तैवानच्या मशरूमचे सत्य !’, असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे.
'माझं नाव मेसी जो आहे. मी तैवानची रहिवासी आहे. मी भारतातील एक बातमी पाहिली, ज्यामध्ये एक भारतीय नेता तैवानमध्ये १२०० डॉलर किमतीचे मशरूम असल्याचं सांगत आहे. हे मशरूम खाल्ल्यामुळे त्वचा चांगली आणि गोरी होते असा दावा ते करत आहेत. मी इतकी वर्ष इथे राहत आहे, पण असं कधी ऐकलेलं नाही आणि हे अशक्यही आहे. त्यामुळे कृपया तुमच्या राजकारणासाठी माझ्या देशाचे नाव वापरू नका', असं ही महिला म्हणाली आहे.
80-80 हजाराचे 5 मशरूम खातात मोदी - अल्पेश''मोदी जे खातात ते तुम्ही खाऊ शकत नाही, कारण ते गरीबांचं जेवण करत नाहीत असं मला कोणीतरी म्हणालं. त्यामुळे ते नेमकं काय खातात असं मी विचारलं तर ते मशरूम खातात असं मला उत्तर मिळालं. पण साधं मशरूम ते खात नाहीत तर त्यांच्यासाठी खास तायवान येथून मशरूम येतं. त्या एका मशरूमची किंमत 80 हजार रूपये आहे, असे 5 मशरूम मोदी दररोज खातात. मुख्यमंत्री बनल्यापासून ते हे मशरूम खात आहेत'' असं उत्तर मला समोरून मिळालं.
35 वर्षांपूर्वीचा फोटो पाहिलाय - अल्पेश''मी मोदींचा 35 वर्षांपूर्वीचा फोटो पाहिलाय , ते माझ्याप्रमाणेच रंगाने काळे होते. जो पंतप्रधान दिवसाला 4 लाखांचे मशरूम खातो, म्हणजे महिन्याला 1 कोटी 20 लाखांचे मशरूम खातो त्यांना गरिबांचं जेवण आवडणार नाही...ते केवळ दिखावा करतात''.