चेन्नई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे महाबलीपूरममध्ये स्वागत केले आले. पंतप्रधान मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची दोन दिवसांची शिखर परिषद होणार असून या परिषदेमध्ये अनौपचारिक स्वरुपाची चर्चा होणार आहे. या परिषदेसाठी भारताकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (12 ऑक्टोबर) सकाळी महाबलीपूरम येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता केली आहे. मोदींनी ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट करून माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदी महाबलीपूरमच्या समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिकचा कचरा गोळा केला. जवळपास अर्धा तास मोदी यांनी समुद्र किनाऱ्यावर कचरा गोळा केला. प्लास्टिकची पाकिटं, बाटल्या आणि इतर कचरा मोदींनी गोळा करून साफसफाई केली आहे. तसेच व्हिडीओ पोस्ट करून सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे असं म्हटलं आहे.
'आपण सर्वांनीच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच आपण सर्वांनी तंदुरुस्त राहाण्याचाही प्रयत्न करायला हवा,’ असं आवाहन नागरिकांना मोदींनी केलं आहे. साफसफाईचा तीन मिनिटांचा व्हिडिओ ट्विटवर पोस्ट करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी गोळा केलेला प्लास्टिकचा कचरा हा ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या हॉटेलचा कर्मचारी जयराज यांच्याकडे दिला.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे शुक्रवारी दुपारी चेन्नई विमानतळावर भरतनाट्यम आणि लोकनृत्य कलाकारांनी तामिळ सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून मोठ्या उत्साहात स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग द्विपक्षीय संबंधात संतुलन आणण्यासाठी प्रयत्नांवर चर्चा करू शकतात. या चर्चेदरम्यान कोणताही अजेंडा असणार नाही. काश्मिरातील कलम 370 हटविल्यानंतर प्रथमच मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात चर्चा होत आहे.
भारताकडून या परिषदेच्या चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सहभागी होणार आहेत. तर चीनकडून जिनपिंग यांच्यासोबत 100 जणांचे शिष्टमंडळही आले आहे. यामध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ही अनौपचारिक स्वरुपाची चर्चा असणार आहे. त्यामुळे कोणताही करार या बैठकीअंती होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.