Rajnath Singh Bihar Visit: भारतात सध्या लोकसभा निवडणुकीची धुम पाहायला मिळत आहे. विरोधक भाजपाच्या पराभवावर भाष्य करत आहेत, तर भाजपवाले तिसऱ्या टर्ममध्ये 400 पारचा नारा देत आहेत. अशातच आता भाजपाच्या चौथ्या टर्मची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा भाजपाचे दिग्गज नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी सुरू केली.
बिहारच्या दरभंगा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. "आम्ही तिसरी टर्म सत्ता उपभोगण्यासाठी नाही, तर राष्ट्र उभारणीसाठी मागत आहोत. आम्ही आता तिसऱ्या टर्मसाठी नाही, तर चौथ्या टर्मबद्दल बोलायला आलो आहोत," असे राजनाथ सिंह म्हणाले.
संरक्षण मंत्री पुढे म्हणतात, "पंतप्रधान मोदींपूर्वी आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात 11 व्या स्थानावर होती, परंतु आपल्या सरकारच्या धोरणांमुळे देश आता 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आता तुम्ही पाहिलेच असेल की, आम्ही सर्व भारतीयांना लसीचे दोन डोस दिले. कतारच्या कोर्टात ज्या भारतीय माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यांना पंतप्रधानांमुळे माफी मिळाली."
कर्पूरी ठाकूर यांचा उल्लेख केला"आम्ही कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिला. काँग्रेसच्या काळात त्यांची उपेक्षा करण्यात आली. त्यांच्या काळात एकाच कुटुंबाला हे सर्व मिळायचे. पीएम मोदींनी पी.व्ही. नरसिंह राव यांनाही भारतरत्न दिला. काँग्रेस नेत्यांच्या योगदानाचा आम्ही गौरव केला. काँग्रेस 30-32 वर्षांपासून विधानसभा आणि संसदेत माता-भगिनींसाठीचे 33 टक्के आरक्षण रोखत आले, भारतीय जनता पक्षाने ते काम पूर्ण केले," असा दावाही त्यांनी यावेळी केला.
आम्ही जे बोलतो, ते करतो...संरक्षण मंत्री पुढे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. एक काळ असा होता, जेव्हा आपण फक्त 1,000 कोटी रुपयांच्या संरक्षण वस्तूंची निर्यात करायचो. आज आपण 20 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे संरक्षण साहित्य जगाला निर्यात करत आहोत. आज आपण 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे संरक्षण उत्पादन करत आहोत. कोणत्याही व्यक्तीची किंवा राजकीय पक्षाची सर्वात मोठी संपत्ती ही त्याची विश्वासार्हता असते. निवडणुकीच्या काळात नेते आणि त्यांचे पक्ष बोलतात एक आणि करतात एक. पण आम्ही जे बोलतो, ते करतो."
भाजपाच्या जाहीरनाम्याचा उल्लेखयावेळी राजनाथ सिंह यांनी एक किस्सा सांगितला. "2014 साली मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. जेव्हा पक्षाचा जाहीरनामा तयार होत होता, तेव्हा मोदीजी मला म्हणाले- घोषणापत्रात फक्त त्या गोष्टी घ्या, ज्या पूर्ण करता येतील. 2019 मध्ये मी गृहमंत्री होतो. पंतप्रधानांनी जाहीरनामा बनवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. संसदेच्या दोन्ही सभागृहात आमचे पूर्ण बहुमत असताना आम्ही जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करू, असे आम्ही जाहीरनाम्यात म्हटले होते आणि आम्ही ते पूर्ण केले. राम मंदिराचे वचन आम्ही पूर्ण केले, असेही ते यावेळी म्हणाले.