कानपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर वारंवार दिसून येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींचे युपी दौरे वाढले असून ते तेथील जनतेला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतेच त्यांनी आयआयटी कानपूरला भेट देत. मोदींच्या सरप्राईज व्हिसीटमुळे कानपूर आयआयटीच्या विद्यार्थ्यांनाही आश्चर्य वाटले. मोदींच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक भाजपा नेत्यांनी हा व्हिडिओ ट्विट करत ही सरप्राईज व्हिसीट असल्याचं म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पदवीदान समारंभासाठी आयआयटी कानपूरमध्ये गेले होते. येथील ५४ व्या पदवीदान समारंभामध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधानांनी देशाची धुरा आता तरुणांनी आपल्या खांद्यावर घ्यावी असं म्हटलं. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषणही केलं. सरधोपट मार्ग सोडून आव्हानांचा स्वीकार करावा आणि येत्या २५ वर्षांमध्ये आपल्याला जसा देश पाहिजे आहे, त्यासाठी काम सुरू करावं असं आवाहनही भावी इंजिनिअर्संना केलं. देशघडणीच्या कार्यात आतापर्यंत आपण खूप वेळ वाया घालविला आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.