हार्ट अटॅकच्या वाढत्या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दररोज अशी प्रकरणं आणि त्यांच्याशी संबंधित व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यामुळे आपल्याला धक्का बसतो. उत्तराखंडच्या उधम सिंह नगरमधूनअशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. कविता वाचताना एका कवीचा मृत्यू झाला. समोर बसलेल्या एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये ही घटना कैद झाली आहे.
उधमसिंह नगर येथील पंतनगर कृषी विद्यापीठाच्या डॉ.बीबी सिंह सभागृहात काव्य महोत्सव सुरू होता. अनेक कवी सहभागी झाले होते. पंतनगरचे रहिवासी सुभाष चतुर्वेदी कविता वाचत होते. कवी सुभाष काही ओळी वाचत असताना अचानक खाली पडले. आयोजकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं, तेथून त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
सुभाष चतुर्वेदी यांची पंतनगर विद्यापीठात 1974 साली सहाय्यक लेखापाल म्हणून नियुक्ती झाली. 2014 मध्ये त्यांनी विद्यापीठातून निवृत्त होऊन जवाहरनगरमध्ये घर बांधले. विद्यापीठ कॅम्पसमधील सेंटर कॅन्टीन त्यांचा मुलगा चालवतो.
या घटनेबाबत एसपी मनोज कत्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांना एका काव्य संमेलनात कविता म्हणताना एका कवीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मृतदेह घेऊन कुटुंबीय मथुरा येथे गेले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.