पोलीस म्हटले की कर्तव्यदक्ष आणि आपल्या आक्रमक पवित्रामुळे ओळखले जातात. मध्य प्रदेशातील मगरोन पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी श्रद्धा शुक्ला कर्तव्यदक्ष तर आहेतच. मात्र, श्रद्धा शुक्ला यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सुद्धा त्यांचे कौतुक केले आहे.
मगरोन बस स्टँड परिसरात एक निराधार वृद्ध महिला फिरत होती. त्या महिलेला पोलीस अधिकारी श्रद्धा शुक्ला यांनी स्वच्छ कपडे घातले आणि पायात चप्पल घातली. त्यानंतर त्यांनी या निराधार महिलेची माहिती जाणून घेतली. या वृद्ध महिलेने लुली बाय-पासजवळील हरदुआ गावची असल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेचा मुलगा मिठ्ठू सिंह याला श्रद्धा शुक्ला यांनी पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. मिठ्ठू सिंह याची चौकशी केल्यानंतर श्रद्धा शुक्ला यांनी आपल्या वाहनातून या महिलेला हरदुआ या गावी सोडले.
दरम्यान, यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्रद्धा शुक्ला यांच्या या कार्याबद्दल सर्वच स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे. तसेच, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ट्विटरवरुन श्रद्धा शुक्ला यांचे कौतुक केले आहे.